।।श्री ।।
मंगलादेवीच्या आशीर्वादाने, वेंकटरमणाच्या आणि गोकर्णाच्या सानिध्याने पुनीत झालेली भूमी. गुरूपूरा आणि नेत्रावतीच्या पाण्यानी सुजलाम सुफलाम होऊन बहरलेली भूमी. ईश्वराने आणि निसर्गाने हया भूमीवर – हया – मंगळूर वर मुक्त हस्ताने संपन्नतेची उधळण केली आहे. इथल निळं पाणी,,लाल माती निसर्गाचं गीत गात आहेत. इथली आखीव – रेखीव कौलारू घरं आणि त्या सभोवती असणारी अशोक माडाची देखणी गर्दी. या हिरवाईची शीतलता त्या घराला आणि घरातल्या माणसांना सुद्धा लाभलेली आहे आणि अतिथी देवो भव ही आपली संस्कृती जतन करणारा – निर्मळ मनाचा मंगळुरी माणूस येथे राहतो आहे .
अस हे कर्नाटकातल सदाबहार मंगळूर !
ह्या मंगळूर मध्ये एक प्राचीन विठ्ठल मंदिर आहे. पहाटेची प्रसन्न वेळ.पाखरांच गाणं, झावळ्यांच सळसळणं , फुलांचा दरवळ – हे जणू विठ्ठलाच नामस्मरण करत आहेत. हया देवळाच पौरोहित्य करणारे विठ्ठल भट यांचं धीरगंभीर व सुमधुर आवाजातील स्तोत्र वातावरणातलं पावित्र्य वाढवत आहे. आता विठ्ठल भटांच्या आवाजात एक लहान आवाज सामील झाला आहे.तो आपल्या बाल किनऱ्या नाजूक आवाजात गायत्री मंत्र म्हणतो आहे, विठ्ठलाचा मंत्र जपतो आहे.
हो, तो बाल आवाज माझा आहे. हो, तो मीच आहे – उपेंद्र – उपेंद्र भट
मंगळूर च्या संपन्नभूमीत, भटांच्या सुसंस्कृत घरात माझा जन्म झाला. २१ एप्रिल १९५० हया दिवशी ! माझे वडील श्री. विठ्ठल भट. संस्कृत पंडित. अत्यंत हुशार, अनुष्ठानी व्यक्तिमत्व. आमच्या गावात माझ्या वडिलांना फार मान होता. माझे वडील विठ्ठल भट सांगतील तो शेवटचा शब्द मानला जायचा. ते फार भाविक होते. मला आठवतंय…दररोज पहाटेस उठून विहिरीवर स्नान करून निर्मळ होऊन १००० वेळा गायत्री मंत्र व विठ्ठल नामाच उच्चारण ते करत. नंतर नित्यनियमाची पूजा – अर्चा हा त्यांचा दिनक्रम असे. अगदी शेवट पर्यंत त्यांनी हा नियम कधीच मोडला नाही. माझे वडील संस्कृत पंडित होते, त्यांचा ज्योतिषशास्त्राचाही विशेष अभ्यास होता आणि म्हणूनच असं बुद्धिमान व्यक्तिमत्व असणाऱ्या माझ्या वडिलांना मी वैदिक शास्त्र शिकावं अस वाटणं अगदी साहजिक होतं. त्यांनी त्यानुसार मला शिक्षण देण्यास सुरवात ही केली. माझ्या मौजबंधना नंतर त्यांनी आमच्याच मठात राहणाऱ्या एका संन्याशाकडे मला अध्यायनास पाठवायला सुरुवात केली. बौध्दिक शिक्षण तर हवंच पण ते आत्मसात करण्याकरता शरीरही तसच मजबूत हवं अस माझ्या वडिलांना (बाप्पांना ), वाटत असे . आणि म्हणूनच त्यांनी मला लहानपणापासूनच सूर्यनमस्कार – योगासन शिकवायला सुरवात केली. बाप्पा अगदी शिस्तप्रिय होते. कधी कधी ते थोडंसं त्रासदायक वाटत असे. त्या शिस्तीच्या पायऱ्या चढताना दम लागला, पण शिखरावर पोहोचण्याचा आनंद ही मिळाला आणि सर्वांकडे नम्र पणे बघण्याची दृष्टी ही लाभली.
कार्तिक महिन्यात – आमच्या गावातल्या सगळ्याच देवळांमध्ये काकड आरती होत असे. पहाटेचं वातावरण, अंगावर शिरशिरी आणणारी थंडी, पक्ष्यांचं गायन, उजेड – अंधाराचा नयनरम्य खेळ अशा सुरेख वातावरणात मंदिरातल्या देवांना गरम पाणी – पंचामृतानी घातले जाणारे स्नान, धीरगंभीर आवाजात उच्चारली जाणारी स्तोत्रं या सगळ्यामुळे दिवस कसा प्रसन्न – मंगल वाटू लागे. पण मंडळी हे सुख बघण्याकरता फार लवकर उठून आन्हिक उरकाव लागे. मला जरा जडच जायचं कारण मला उबदार रजई मध्ये फुरगुंटून झोपणच जास्त आवडत असे. पण बाप्पांची ‘कृष्णा’ अशी हाक ऐकली की मी खडबडून उठत असे आणि त्यांच्या बरोबर काकड आरतीला जात असे. एके वर्षी आमच्या मंदिरात गोकर्ण मठाचे अधिपती श्री. द्वारकानाथ स्वामी आले होते. त्यांनी परीक्षा घेतली की बाप्पांनी काय शिकवलं? मला वडिलांनी संस्कृत – वेद शिकवले, दामोदर स्तोत्र शिकवलं तेव्हा काहीच न कळलेले भूप – भैरव राग ही शिकवले, तसं म्हटलं तर माझे बाप्पाच माझे पहिले गुरु होते. तेव्हा मी बाप्पांनी शिकवलेली
“रंगायक राणीव लोचन
रमण नी बेळगाईत येळ
आंगणे लकुमिता पतीय न्नो”
ही भूपाळी ही म्हणालो होतो. आजही मला असंच वाटतं की बाप्पांचा आवाज माझ्यापेक्षा फार गोड होता.
मेंगलोर हे देवळांच गाव. गावात वेंकटरमणच मोठ्ठ मंदिर होते. आणि त्याच्या समोर आमच देऊळ. सगळ्या देवळांमध्ये पहाटे ५ : ०० वाजता आरती – काकडा व्हायचा आणि आमच्या देवळात ५ : १५ वाजता. सगळी भक्त मंडळी वेंकटरमणाची आरती करून आमच्या देवळात यायची मी पण बाप्पांबरोबर असायचोच. लोक कौतुकानं म्हणत ‘छान म्हणतोय चांगला तयार होईल’.
हया वेंकटरमनाच्या देवळात पहाटे ध्वनिमुद्रिका लावली जायची आणि गोपुरावर कर्णा असायचा त्यामुळे ते अभंग सर्वदूर ऐकू यायचे. ती कन्नड भजनं फार श्रवणीय होती.
‘हरिभजने माडो निरंतरा’ हे संत पुरंदरदासांचं भजन माझ्या कानात आजही गुंजारव करतं. त्यावेळेसचा तो आवाज आजही मला मोहित करतो, आत्मभान विसरायला लावतो, अत्यंत समाधान आणि आनंद देतो, तो आवाज ‘माझ्या’ गुरुजींचा पं. भीमसेन जोशींचा असतो हे वेगळं सांगायला नकोच. हा आवाज ऐकतच मी मोठा झालो हे माझं भाग्य आहे. त्या आवाजाची मोहिनी मला गुणगुणायला शिकवत होती, त्यावेळेस समजतही नव्हतं कि हा आवाज सतत काना – मनात गुंजणार आहे.
माझं आयुष्य उजळवणार आहे.
—