Skip to content

- भाग २ -
माझी शाळा

।।श्री ।।

माझे बाप्पा पुराण प्रवचनकार होते. अधिकमास – कार्तिकी – आषाढी अशा वेळेस कीर्तन प्रवचन करीत आणि ते संपल की १५ मिनिटं भजन म्हणतं. त्यांना एकाने हार्मोनिअम आणून दिली. मी ९ – १० वर्षाचा होतो. मी सहजच त्यावरून बोटं फिरवली. मला कळालं नाही पण संवादीनीच्या त्या लहरींनी मला एका वेगळ्या विश्वात नेल आणि मी सहजपणे त्या सुरावटींवर गाऊ लागलो. बोटं आणि गळा यांचा अनोखा मेल घालता येतो हे मला गवसलं ! गाण ऐकायचो आणि हार्मोनिअमवर बोटं आणि गळ्यात सूरं घुमवायचो. मला त्याची गोडीच लागली. काय सांगू तुम्हाला लता मंगेशकर, आशा भोसले यांची गाणी ही मी म्हणू लागलो. आतली गोष्ट सांगतो कामधाम संसार विसरलो , “हरी भजनी रंगली राधिका” हे गाणही मी छान म्हणायचो.

माझ्या शाळेने मला गातं केलं, मला गाण्याची संधी दिली. खर तर विषयाला अनुसरून नाहीये पण तरी ही सांगतो त्यावेळी माझ्या बालमनात एक प्रश्न सतत यायचा, त्याचं पटेल अस उत्तर मला आज ही मिळत नाहीये. मी वैदिकाचा मुलगा, सामान्य आर्थिक परिस्थिती असणारा, आणि शाळेतली इतर धनिकांची मुलं यात थोडा का होईना पण, मला वाईट वाटेल इतपत भेदभाव केला जायचा. असं का ? पण हया गाण्यानी संगीताने ही आर्थिक दरी दूर केली आणि मी शाळेचा झालो. फार खोडकर होतो बर मी शाळेत असताना. हां माझ्या शाळेच नाव सांगतो हं :- शाळेच नाव होतं काडबितल ! काड म्हणजे जंगल आणि बितल म्हणजे जंगलाच आंगण !

माझा देवळात सुरु झालेला हा गाण्याचा प्रवास आता शाळेपर्यंत पोहचला होता. आमच्या वेळेस संगीत विषय असायचा. आम्हाला मनोरमा टीचर होत्या संगीत शिकवायला. त्यांच्या तासाला हार्मोनिअम वर्गात आणून ठेवायच काम माझ्याकडे होतं. एका तासाला मी अशीच पेटी आणली पण बराच वेळ झाला तरी टीचर येईनात आणि आणि मला एका जागेवर बसवेना, मग मी उठलो आणि माझ्या ही नकळत मी संवादीनी वाजवायला सुरूवात केली. आणि हार्मोनिअमचा भाता बंद करायला विसरलो. बाईंच्या लक्षात आल की हार्मोनिअमला कुणी तरी हात लावला आहे. त्यांनी करड्या आवाजात विचारल कुणी हात लावला पेटीला ? मुलांनी त्वरीत माझ्याकडे बोट दाखवल. ह्याने उपेंद्रने ! झालं! पुढे ये तो करडा आवाज अधिकच करडा झाला. मी गेलो हात पुढे कर. मी घाबरतच हात पुढे केला आणि सप्पकन हातावर पट्टीचा फटका बसला. हार्मोनिअमची पट्टी शोधून सूर लावणं सोप्पं होतं पण बाईंनी ओढलेल्या पट्टीच्या फटक्याने माझा सूर तार सप्तकातही लागतो हा शोध मात्र मला तेव्हा लागला.

मी घाबरून आणि अपमानित होऊन उभा राहिलो. का हात लावलास ? परत एकदा करडा आवाज कडाडला. बाई तुम्ही आला नव्हतात, पेटी होती, मला एक गाणं वाजवता येत होतं म्हणून न राहवून मी पेटीवर ते गाण वाजवत होतो. आता मनोरमा टीचर चकित झाल्या. करड्या आवाजाची पट्टी खाली आली आणि त्या म्हणाल्या – वाजव बर – काय वाजवत होतास ? मी लगेच हातावर हात चोळला वेदना दूर पळाल्या आणि बोट हार्मोनिअमवर सहज फिरू लागली. मनोरमा टीचरना झालेलं दुःख त्यांच्या पाणावलेल्या नजरेतून थेट मला जाणवलं. बाळा लागलं का रे ! मुलांनी वाजवलेल्या टाळ्यांच्या आनंदात मी ‘नाही’ अशी मान डोलावली !!

माझी शाळा संस्कृत शाळा असल्यामुळे दर एकादशीला शाळेचा शेवटचा तास भजनाचा असे. शाळेतले सगळे विद्यार्थी एकत्र भजन म्हणत आणि गंमत म्हणजे ही मराठी भजने असत आठवतय मला :-

भजनारंभी नमस्कार त्या वसिष्ठ नारद भीमाला

जगोद् धारक भार्गव तो तुज विघ्नविनाशक मोरयाला !!

हार्मोनिअमच्या प्रसंगा नंतर बाईंनी सगळ्या शाळे समोर मला बोलावल आणि आता उपेंद्र एकटा एक भजन म्हणणार आहे असं सागितलं ! माझ्या मनातली अढी दुःख सगळ सगळ वाहून गेल आणि मी तन्मयतेने गायलो “श्री राम जयराम जयजय राम !!” संगीत क्षेत्रातल्या रामराया पाउल टाकण्याचा चा हा शुभारंभ होता.

माझ्या खोडकरपणाचा अजून एक किस्सा सांगतो. हा कांही संगीताशी निगडीत नाही पण सहज गंमत म्हणून सांगतो बर का, एकदा बाईंनी जोरात हाक मारली कृष्णा, आणि …. सगळे इकडे या. आम्ही एकमेकांकडे बघितल आता कुणी काय केल ? बाईं समोर जाऊन उभं राहिलो त्या थोड्धाश्या घाबरलेल्या बघतो तर उंदीर धड पिंजऱ्यात अडकला नाही आणि धड पूर्ण बाहेर नाही. काय करायच ह्याच ? बाईंनी जरा मावळ शब्दात विचारलं. आता कसही करून त्याला पकडायला तर पाहिजे. एक खट्याळ विचार बालमनात डोकावला द्यायचा का सोडून ? पण नाही केल तस मग एक जाड दोरा आणला, त्याचा फास बनवला तो उंदराच्या शेपटीला बांधला काढला बाहेर त्याला, बाईनी सुटकेचा श्वास सोडला खरा पण आम्हाला खेळण्याच एक साधन मिळालं असो चल जाऊया पुढे…..